-सागर जगदाळे
भिगवण : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मदनवाडी (ता.इंदापूर) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अतुल देवकाते यांच्यावर एका टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. 09) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम राजेंद्र ढवळे, अमित रावसाहेब देवकाते, अदित्य बाळासो ढवळे, अविनाष बाळासो ढवळे, पार्थ कैलास ढवळे, बाळासो सर्जेराव ढवळे, राजेंद्र अर्जुन ढवळे, कैलास अर्जुन ढवळे (सर्व रा. मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी महादेव अर्जुन देवकाते (रा.मदनवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव देवकाते हे कुटुंबासोबत मदनवाडी परिसरात राहतात. देवकाते कुटुंब व आरोपींची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. देवकाते कुटुंबाला हिसका दाखवायचा असे आरोपींनी ठरविले होते.
दरम्यान, या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अतुल देवकाते यांच्यावर लोखंडी रॉड, तलवार व खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. अतुल देवकाते यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे.