उरुळी कांचन (पुणे) : विधवा महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी तसेच पतीच्या निधनानंतर तिचे कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या न काढता ती आभूषणे कायम ठेवून जुन्या परंपरा मोडीत काढून सन्मानाने वागविले पाहिजे असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे बडेकर या मागील काही दिवसापासून विधवा महिलांना एकत्र करून इतर महिलांप्रमाने समाजात स्थान देण्यासाठी हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. समाजात अजूनही विधवांना स्वीकारलं जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन बडेकर करीत आहेत.
विधवा प्रथेचे निर्मूलन करतानाच त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे याबाबत तसेच समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन सद्यःस्थितीत विधवांचे समाजातील स्थान व त्यांना मिळणारी वागणूक व विधवा प्रथेबाबत समाजाची मानसिकता बदलणे व विधवांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विविध उपक्रमात सहभागी करणे आदी उपक्रम करून विधवा महिलांमध्ये जनजागृती सुरु केली आहे.
संपूर्ण राज्यामध्ये विधवा प्रथा बंद करण्याबाबत अनेक ग्रामपंचायती पुढे येत असताना उरुळी कांचन सारख्या सर्वात मोठ्या असलेल्या गावातील महिलांनी हे धाडसी निर्णय घेत जनजगागृती करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीमध्ये प्रस्ताव देऊन ग्रामसभा घेऊन हा ठराव लोकांसमोर मांडण्याचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीहि यावेळी बडेकर यांनी दिली आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा कांचन, बेबी ढवळे, शितल खोंडवे, यांच्या संकल्पनेतून सुरु आहे.
गावागावात महिला सरपंच ग्रामपंचायतींचा कारभार यशस्वीपणे करीत आहेत. काही ठिकाणी पुरुषांपेक्षा अधिक सक्षमपणे महिला कारभार करत असल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत महिलांचे अधिकार हे अबाधित ठेवून त्यांना चांगले जीवन, त्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
याबाबत हेमलता बडेकर म्हणाल्या, “पती गेल्यानंतर त्या विधवेला पुढील आयुष्य जगताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यांना कुठलेही सन्मान दिले जात नाही. कार्यक्रमात स्थान दिले जात नाही. आपली मुलगी, नात्यातील मुलगी ही कधीतरी त्या अवस्थेतून जात असते. तिलाही अशी वागणूक मिळाली की, आपल्याला चीड येते आणि समोरच्याशी भांडत असतो. त्यापुढे काही करत नाही मात्र परक्या मुलींबाबत असा विचार करताना रूढी-परंपरा याचा आधार घेतला जातो, हे बंद केले पाहिजे.