पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. गुन्हेगारीच्या एका मागून एक घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पद्मावती परिसरात घडली आहे. याबाबत 24 वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
सत्यवान अनिल मोहिते (वय 26, रा. इंदापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वीच या जोडप्यांचा विवाह झाला आहे. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद होत असत. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी देखील त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. तेव्हा सत्यवान याने पत्नीला मारहाण केली. त्याची पत्नी घराबाहेर जात असताना तिचा गळा दाबून तिला खाली पाडला. त्यानंतर दोन्ही हाताने ठार मारण्याच्या उद्देशाने पत्नीचा गळा दाबला. या सगळ्या झटापटीत पत्नी जागीच बेशुद्ध पडली. तेव्हा ती मयत झाल्याचा भास पतीला झाला अन् त्याने घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला. असे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.