खेड : खेडमधील विर्हाम येथे यात्रेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याकार्यक्रमात एका भीम गीताला गावातील जातीयवादी विचारसरणीच्या लोकांनी विरोध केला. मात्र, हे भीम गीत झालेच पाहिजे असा आग्रह धरणा-या तीन जणांना जातीवाचक शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) खेड तालुक्यातील विर्हाम येथे घडली. याप्रकरणी 11 जणांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल सावंत, सोमनाथ सावंत, रोहन शिंदे, सोमनाथ शिंदे, महेश हांडे, नवनाथ गि-हे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत स्वप्निल गायकवाड यांनी खेड पोलीसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल गायकवाड हे त्यांच्या पत्नीसोबत विर्हाम गावच्या सायबा देवीच्या यात्रेनिमित्त शनिवारी (दि.14) मावशीकडे गेले होते. दुस-या दिवशी रविवारी यात्रेनिमित्त गावक-यांनी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी स्वप्निल गायकवाड, हे त्यांची पत्नी श्रृती, मावशी कविता रोकडे, मावशीचा मुलगा प्रथमेश असे सर्वजण हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. रात्री साडेबाराच्या दरम्यान ऑर्केस्ट्रा पाहणा-या काही श्रोत्यांनी भीम गीते लावण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी गाणे सुरु झाल्यानंतर एका व्यक्तीने मखमली कापडाला दगड बांधून तो स्टेजवर असलेल्या महिलेच्या अंगावर फेकला आणि शिवीगाळ करायला लागला. त्यादरम्यान फिर्यादी गायकवाड याने बाबासाहेबांचे गाणे होऊ द्या, असे सांगितल्याने त्याचा राग धरुन 10 ते 12 जण येऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.
यावेळी मारहाण सोडवण्यासाठी गायकवाड यांची पत्नी आणि मावशी आली असता त्यांनाही त्याचपद्धतीने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत स्वप्नील गायकवाड, त्याची पत्नी आणि मावशी गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार मारहाण करणा-या चार गावातील सात आणि इतर चार असे 11 जणांच्या विरोधात अॅट्रोसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलीसांनी वाळके ऊर्फ सोमनाथ सावंत, नवनाथ गि-हे यांना अटक केली असून त्यांना पुढील तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.