अजित जगताप
सातारा : अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये महाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ-जाधव यांनी देशात पहिला येण्याचा मान मिळवला. दिल्ली येथील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने झालेल्या या परीक्षेत त्यांनी २५० पैकी २२४ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवून साताऱ्याच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे.
केंद्रीय परीक्षेत संकपाळ-जाधव या बहुमान मिळवणाऱ्या सहा पो. उप. नि.प्रियंका संकपाळ-जाधव या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण ७६ फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत स्वरूपात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे.
प्रियंका संकपाळ-जाधव या सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सी आय डी, पुणे येथे कार्यरत आहेत. सातारा तालुक्यातील अतिदुर्गम अशा धावली गावच्या त्या रहिवासी आहेत.यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) पंकज देशमुख,अंगुली मुद्रा केंद्र पोलीस अधीक्षक श्रीरंग टेकवडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिदास कसार आदी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ शशिकांत शिंदे व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.