दौंड : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बाळाच्या कुटुंबियांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज २५ लाखांची मदत देण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील एका शेतामध्ये ऊसतोडणी करीत असताना मजूर विष्णू करण मोरे यांच्या ३ महिने वय असलेल्या एका लहान बाळाचा, बिबट्याच्या हल्ल्यात दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला होता.
या कुटुंबातील सदस्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने एकूण २५ लाख रुपयांची मदत शासनाने वन विभागामार्फत जाहीर केली होती. आज मृत्युमुखी पडलेल्या लहान बाळाच्या आई-वडिलांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अंकुश खरात, वनरक्षक शितल मेरगळ आदि उपस्थित होते.