पुणे : डोंबिवली येथे एका महिला डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणामुळे शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह इतर तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत म्हणजेच 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण न्यायालयातील कोर्ट हॉल 6 मध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. एस. कातकडे यांच्या समोर ही सुनावणी झाली. यावेळी रमेश म्हात्रे यांच्या बाजूने वकील आनंद पथकी तर सरकारच्या वतीने वकील आनंद आढसकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

या घटनेचे राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. मारहाणीचे हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांकडून रमेश म्हात्रे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची तयारी सुरू झाली आहे. पक्षाने त्यांना एक ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली असून, “या डॉक्टर मारहाण प्रकरणावरून तुमच्यावर पक्षाने शिस्तभंगविषयक कारवाई का करू नये?” अशी विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हात्रे यांचा राजीनामा घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, आज रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर केले जात असताना न्यायालय परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण झाले.आरोपींपैकी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्याची कागदपत्रे न्यायाधीशांना दाखवण्यासाठी फिर्यादीच्या नातेवाईकांनी कोर्टात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बाहेरच रोखले. यावरून फिर्यादीचे नातेवाईक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची व वाद झाला.
या गोंधळामुळे कोर्ट परिसरातील सुरक्षा व्यवस्था काही काळ वाढवावी लागली होती. अखेर न्यायालयाने सर्व आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने आता पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी केली जाईल.







