मुंबई: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी, बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत, अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी सुचवणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.
सदरच्या खटल्यात महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर आता 11 एप्रिल 2025 रोजी सर्व आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती आणि मुलीलाही त्या दिवशी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सुनावणी दरम्यान, न्यायालयाने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कठोर टीका केली. हत्या झाल्यानंतर दोन वर्षांनी शोधमोहीम, एक वर्षानंतर आरोपींचे मोबाइल ताब्यात घेणे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणे या चुका न्यायालयाने निदर्शनास आणल्या. तसेच “हत्या करणाऱ्या आरोपीला पदकासाठी शिफारस करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसतो,” असे न्यायालयाने म्हटले आहे.
नेमकं प्रकरण कायं?
11 एप्रिल 2016 रोजी अभय कुरुंदकर याने त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर अश्विनी बिद्रेचा अमानुष खून केला होता. त्यानंतर बिद्रे यांच्या मृतदेहाचे वूडकटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचाही त्याच्यावर आरोप होता. या खुनात कुरुंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती. 7 डिसेंबर 2017 मध्ये अभय कुरुंदकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यकरत होता. राजेश पाटील यास 10 डिसेंबर 2017 मध्ये जेरबंद केले होते. या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारी व महेश फळणीकर यांना अटक केली होती. त्यावेळी अश्विनी बिद्रे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होत्या.