Ashok kharat case :नाशिकमधील गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आज न्यायालयात नवं वळण घेतलं. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र, आजची सुनावणी अवघ्या सात मिनिटांत पूर्ण झाली आणि न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या सुनावणीत कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. यापूर्वी तीन वेळा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आज सरकारी पक्षाने अधिकची कोठडी मागितली नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीचा आदेश देण्यात आला. यानंतर तांत्रिकदृष्ट्या खरातच्या जामिनाचा मार्ग खुला होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली असली तरी तपास यंत्रणांनी त्यासाठी आधीच तयारी केली आहे.

दरम्यान, विशेष तपास पथकाने, या प्रकरणात पुढील पावलं वेगाने उचलली आहेत. गुरुवारी (दोन एप्रिल) सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन हजार सहावीस या गुन्ह्यात खरातला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटीने जोरदार तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील सुनावणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

तपासादरम्यान पोलिसांना खरातच्या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा पुन्हा मिळवण्यात यश आलं आहे. या डेटामध्ये काही बड्या राजकीय व्यक्तींचे मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरात तपासात पूर्ण सहकार्य करत नसला, तरी डिजिटल पुरावे त्याच्याविरोधात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
याच प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी खरातच्या मुलाला अटक केली असून त्याची पत्नी सध्या फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होत चाललं असून पीडित महिलांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.







