पहलगाम : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकावर निशाणा साधण्यात आला असताना या हल्ल्यात पुण्यातील तब्बल 150 पर्यटक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे..या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सातत्याने तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर फिरण्यासाठी आलेले जवळपास पुण्यातील दीडशे पर्यटक अडकल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शेकडो पर्यटक जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले आहेत. त्यातील जवळपास दीडशे पर्यटक अडकल्याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यांना पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज नाही शक्य झालं तर, उद्या त्यांना सर्वांना आणू, असंही त्यांनी सांगितलं. श्रीनगर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सातत्याने दूरध्वनीवरून मी माहिती घेत आहे. गृह विभाग अधिकारी जे महाराष्ट्रातले आहेत, ते मदत करण्याचं काम करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही माझ्याकडून माहिती घेतली आहे. त्यासाठी मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यासाठी नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक 9370960061 / 02026123371 असून, नातेवाइकांनी काळजी करू नये. आम्ही सगळे सोबत आहोत, असेही मंत्री मोहोळ म्हणाले आहेत.