पुणे : पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अट्टल गुन्हेगार वारंवार गुन्हे करीत होते. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून एका वर्षातच पुण्यातील तब्बल 103 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये धोकादायक गुन्हेगारांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्यांच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. पुणे पोलीस आयुक्तांनी धोकादायक गुन्हेगारांना झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे कठोर धोरण राबविले. पुणे शहरातील धोकादायक गुन्हेगारांना कारागृहात स्थानबध्द केले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्हेगारांना नागपूर, चंदपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यातील विविध कारागृहामध्ये 1 वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक कठोर व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पुणे पोलीसांकडून राबविण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, सन 2024 मध्ये आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, वाहन तोड-फोड, रायट, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, हत्यारे बाळगणे, गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणाऱ्या व सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करणाऱ्या 103 अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे.
ही उल्लेखनिय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोका एमपीडीए सेलचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस ठाण्यातील सर्व्हेलंस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे.