अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी, (यवतमाळ) : राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ एन.व्ही. न्हावकर व सचिव के.ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार २९ ऑगस्ट रोजी ‘महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटंजी तालुक्यातील येरंडगांव येथे रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९, वाहतुक नियम व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ ईत्यादी विषयां संदर्भात विधी साक्षरता शिबिर संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अ. उत्पात हे होते. शिबिराच्या वेळी न्यायाधीश अतुल अ. उत्पात यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले व मुलभूत अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून दिली.
विद्यार्थ्यांपैकी मुलगा, मुलगी यांना कोणी वाईट स्पर्श केल्यास स्वसंरक्षण अधिकाराचा वापर करून त्याचा प्रतिरोध करणे तसेच तात्काळ पालकांना व शिक्षकांना त्यासंदर्भात माहिती देणेबाबत मार्गदर्शन करून बचावाकरीता व्यायामाचे महत्व पटवून दिले. भ्रमणध्वनीचा (मोबाईल) वापर करतेवेळी शासनाने बंदी घातलेल्या तसेच समाजास घातक संकेत स्थळावरील छायाचित्र किंवा व्हिडिओ पाहून त्यांना प्रसिध्दी दिल्यास सायबर शाखेमार्फत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल होवू शकतो, याची जाणीव दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अतुल अ. उत्पात यांनी करून दिली.
तसेच शाळेमध्ये शिक्षण घेत असतांना नीती मुल्ये जपणे, समाजात बंधुभाव निर्माण करणे या बाबत न्यायाधीश उत्पात यांनी सांगितले. शाळेमध्ये एकमेकांची छेड काढल्यास रॅगिंग अधिनियम अंतर्गत निलंबन होवून फौजदारी खटला दाखल होईल, याची जाणीव देखील अतुल अ. उत्पात यांनी करून दिली. विधी साक्षरता शिबिरात शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग, शाळेतील कर्मचारी तसेच पोलीस पाटील, न्यायालयीन कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते.