Article : चकाकणाऱ्या जगात वावरणारी आणि स्वतःच्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठणारी अनेक मंडळी आज आत्महत्या करताना किंवा आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते वयस्क गृहस्थापर्यंत आणि सामान्य, बेरोजगार व्यक्तीपासून ते उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत अनेक लोक आत्महत्या करतात. सध्या आत्महत्या वाढलेल्या दिसतात, याची कारणमीमांसा करणे समाज स्वास्थाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. (Article)
सध्या आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. लोकांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार का येतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या मनात काय विचार चालू असतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे. हे समजल्यास आत्महत्या थांबवणे काही प्रमाणात तरी शक्य होईल. (Article)
आत्महत्येच्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण नक्कीच असते. कधीकधी इतरांच्या दृष्टीने अतिशय सामान्य किंवा किरकोळ असलेल्या कारणांमुळे आत्महत्या केली जाते. निराशेच्या गर्तेत सापडलेला माणूस आत्महत्या करतो. आत्महत्या हा काही मानसिक आजार नाही. कधी कधी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
आर्थिक परिस्थिती, नोकरीतील अडचणी, व्यवसायातील नुकसान, एखाद्या गोष्टीचा खोलवर झालेला आघात किंवा मानसिक तणाव आदी कारणे असू शकतात. जीवनात आलेल्या परिस्थितीमुळे काही लोक हिम्मत हरतात. त्यांना असे वाटते की ते या समस्येचा सामना करु शकत नाहीत. घाबरून किंवा समस्येपासून पळण्यासाठी आत्महत्या हा एकच उपाय आहे असे त्यांना वाटते. अनेकदा जवळच्या व्यक्तींकडून मिळालेल्या दुःखाचा जास्त त्रास होतो. (Article)
परिस्थितीशी लढताना हार माणनारे लोक आत्महत्येचा मार्ग निवडतात. पण आत्महत्या अचानक होत नाही. आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये अशी काही लक्षणे दिसत असतातत. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या मित्रांना, नातेवाईकांना ही लक्षणे ओळखता आली पाहिजेत. अशी लक्षणे दिसल्यास आपण संबंधित व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु शकतो.
समाजशील असणारा मनुष्य जेव्हा वैयक्तिक कारणांनी स्वतःसोबत हरतो, त्याची संघर्ष करण्याची उमेद संपून जाते आणि समाजातील कोणताही घटक आपल्यासोबत नाही असे त्याला वाटते, तेव्हा त्या व्यक्तीचे आत्महत्या करण्याचे विचार बळावतात. व्यक्ती स्वकेंद्री म्हणजेच स्वतःपुरता विचार करणारी होते. समाजाची मूल्ये, आचार, नियम आणि व्यक्तीचे वर्तन यांत विसंवाद निर्माण होतो. समाज रचनेतील समतोल बिघडतो. प्रचलित नैतिक मूल्ये कोसळतात आणि व्यक्ती आत्महत्या करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात जवळजवळ ८ लाख लोक आत्महत्या करतात. भारतामध्ये १ लाख ६५ हजार लोकांनी २०२०-२१ मध्ये आत्महत्या केली आहे.
नैराश्य आणि अन्य कारणांमुळे गेल्या काही काळात आत्महत्या करणार्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही बाब जेवढी चिंतनीय आहे, तेवढीच आगामी संकटाची जाणीव करून देणारी आहे. आज आपण बेरोजगारीमुळे, आर्थिक चणचणीमुळे, कर्जबारीपणामुळे लोक आत्महत्या करताना पाहतो. कोविडच्या काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या, उद्योग-व्यवसाय बंद पडले. याची परिणिती आत्महत्यांमध्ये झाल्याचे आपण पाहिले आहे. या आत्महत्यांमागील मुख्य कारण अगतिकता हे होते. कोणतीही व्यक्ती मनात आले की, लगेच दुसर्या सेकंदाला आत्महत्या करीत नाही. आत्महत्येचा विचार प्रबळ होणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे.
काही लोकांच्या मते आत्महत्या करण्यासारखे धाडसी कार्य दुसरे कोणतेही नाही. कारण आपलाच जीव आपणच संपविण्यासाठी प्रचंड मानसिक ताकद लागते. आत्महत्यांची कारणमीमांसा व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर करण्यात येते. काही आत्महत्यांमध्ये या दोहोंचाही एकत्रित संबंध असतो. व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक मूल्ये यांचा विसंवाद झाल्यास व्यक्ती आणि समाज यांत संघर्ष होतो. अशा वेळी व्यक्ती एकाकी पडू शकते. तिचे एकाकी पडणे हे आत्महत्येचे मुख्य कारण ठरते.
आत्महत्यांच्या कारणांबाबत अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी ऊहापोह केला आहे. बेकारी, गरिबी, बेघर असणे तसेच वंश, जात, धर्म, लिंग यातील भेदभावही माणसाला आत्महत्येच्या विचारांकडे नेणारी प्रमुख कारणे आहेत. आताच्या समाजात कौटुंबिक कलहाचे वाढते प्रमाण, बाजारात येणार्या नवनवीन वस्तू घेण्याची जीवघेणी लालसा, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे येणारा एकटेपणा, घटस्फोटांचे वाढते प्रमाण, दारू आणि इतर व्यसनांचे वाढते प्रमाण अशी कारणे आत्महत्यांचे प्रमाण वाढण्यामागे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. नोकरीतील प्रचंड स्पर्धा, कामाचे वाढलेले तास अशा ताणाला सामोरे जावे लागणे आणि नोकरी गेली तर लाजिरवाणी अवस्था होईल, असा मनावर ताण येणे या कात्रीत आयटी तसेच अन्य क्षेत्रांतील माणसे भरडली जातात.
कॉल सेंटरसारख्या ठिकाणी तर रात्री काम करून दिवसा झोपणे अशी निसर्गचक्राच्या विरुद्ध जाणारी जीवनशैली असल्याने अनेकांना तरुण वयात नैराश्य येते. बंगळुरू, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी काम करणारे अनेक लोक अन्य राज्यांतून आलेले असतात. त्यांना या शहरांमध्ये जमवून घेणे अवघड जाते, हेही नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांमागील मोठे कारण आहे. आताच्या समाजव्यवस्थेत तुम्ही यशस्वी असणे म्हणजे उत्तम मार्क मिळवणे आणि भरपूर पैसे कमावून देणारी नोकरी किंवा व्यवसाय करणे असेच समजले जाते. इतरांना समाजात मानाचे स्थान मिळत नाही. विशेषत: आयटी क्षेत्रात इतरांकडे पाहून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा अतिताण वैफल्याकडून एक दिवस आत्महत्येकडे घेऊन जातो. या सगळ्या मागच्या बदललेल्या मानवी सुखांच्या संकल्पनांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
माणूस आता परिपूर्ण व्यक्तिमत्त्व व्हावे अशा प्रयत्नांच्या मागे लागत नाही. आता फक्त घर, गाड्या, घरात निरनिराळ्या वस्तू आणणे यात त्याला अधिक रस आहे. या वस्तूंचा उपभोग घेण्यापेक्षा त्या केवळ आपल्या मालकीच्या आहेत याचा आनंद व त्या स्वत:च्या मालकीच्या आहेत म्हणून इतरांना वाटलेला हेवा उपभोगणे असा प्रकार चालू झाला आहे. या सगळ्यांतून जेव्हा आपल्या समाजात मनोविकारांचे नैराश्य, दडपण आणि भीती अशा इतर अनेक गोष्टींचे प्रमाण खूपच वाढते, त्या वेळी तर त्या रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच समाजालाच कीड लागली आहे की काय याचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. या मताचा आपण गांभीर्याने विचार करणार का? आज वाढत जाणार्या आत्महत्या या नक्कीच चिंतेचे कारण आहे. त्यासाठी अनेक समाजसेवी संस्था देखील कार्यरत आहेत.
जगभरात दरवर्षी जेवढे लोक आत्महत्या करतात, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, १५ ते १९ वर्षे या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचे चौथ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. यामागे वैद्यकीय कारणेही असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणे किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणे, याला ‘सुसाइड आयडिएशन’ म्हणतात. मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारण नसते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी जीवन संपवणे हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो. माझ्या जीवनात काहीच उरलेले नाही. आयुष्य संपवणे हा एकच मार्ग आहे अशी भावना निर्माण होते.
नैराश्याचे शेवटचे टोक म्हणजे आत्महत्यास असा सर्वसाधारण समज आहे. याचे कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील वेगवेगळ्या बदलांमुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागते. त्यामुळे, आत्महत्येचे विचार येतात. आत्महत्येच्या ९० टक्के प्रकरणात मानसिक आजार प्रमुख कारण आहे. डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात. जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.
नैराश्य, मानसिक स्थितीत चढ-उतार, सतत चिंता किंवा अस्वस्थता, ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणे, मनात सतत नकारात्मक भावना, भविष्याबद्दल नकारात्मक कल्पना आदी कारणांमुळे आत्महत्या होतात. नेहमी हसमुख किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागते, अबोल होते. धुम्रपान किंवा मद्यपान अधिक प्रमाणात सुरू होते. हे व्यक्तीत होणारे बदल आहेत. सतत निराशावादी बोलणे, मृत्यूची भाषा करणे, ही काही आजाराची लक्षणे आहेत. एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आत्महत्येचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत वॉर्निंग साईन (धोक्याची सूचना) असतातच असे नाही. पण बऱ्याचदा लोक त्यांच्या भाषेतून किंवा कृतीतून अशा साईन्स देत असतात. एखादा व्यक्ती ज्या गोष्टी सामान्यत: बोलत नाही. अशा गोष्टी वारंवार होत असतील तर त्या वॉर्निंग साईन असू शकतात. नकारात्मक विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतात. काहीवेळा मनात येणारा विचार काही क्षणांचा असतो. तर, काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन हे विचार वाढतात.
मानसिक आजारांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलणे टाळतात. अशावेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावतात. मनात आत्महत्येचा विचार आल्यास मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईनला संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेशक किंवा डॉक्टरांना भेटा. आत्महत्येचा विचार का येतो, हा किती गंभीर आहे याचे निदान महत्त्वाचे आहे. आत्महत्येचा विचार येताक्षणी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वत:साठीच धोका असतो. ते स्वत:चे नुकसान करून घेतात. त्यामुळे तत्काळ योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.
मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला कुटुंबाची साथ सर्वांत जास्त महत्त्वाची असते. कुटुंबियांनी किंवा मित्रांनी संबंधित व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. त्याला मन मोकळे करण्यासाठी धीर दिला पाहिजे. शांत राहून तडकाफडकी कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नका. संबंधित व्यक्तीची समस्या समजून घेऊन ती मान्य करा. ही समस्या नाही असे म्हणून अस्वीकार करू नका. त्यांची भावना समजून घ्या. कुटुंबियांनी आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना कोणताही निर्णय देऊ नये. त्यांना आपले विचार मांडण्यासाठी योग्य जागा दिली पाहिजे. किशोर वयीन मुलांसोबत मानसिक आजार किंवा आत्महत्या या विषयावर चर्चा करावी. यात संकोच असू नये. कुटुंबियांनी आणि संपर्कातील व्यक्तींनी विचार न करता माहित नसलेला चुकीचा सल्ला देऊ नये किंवा थोडो बाहेर फिरून ये, दोन दिवस सुट्टी घे, आराम कर असे कॅज्युअल सल्ले देऊ नयेत.
आत्महत्येच्या विचारांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की, विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही. आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत. औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
शेवटी पैसा महत्वाचा की समाधानी जगणे? तर जगणे महत्वाचे आहे. पैसे काय येतील जातील. गेले तर पुन्हा उभे करता येतील पण जगणेच हातून गेले तर काहीच करता येत नाही. मागे उरते भकास पोकळी आणि कुटुंबावर त्यांच्या कर्जाचा बोजा. आर्थिक प्रगती जरूर करावी, पण इतकीही नाही की आत्महत्येची वेळ यावी. तसेही चांगलं जगायला फार काही लागत नाही. लॉकडाऊन पूर्वी जिथे आपल्याला महिना ५० हजार लागत होते तिथेच लॉकडाऊन काळात २० हजारांत भागत होतेच की! आठवून पहा. मग हा वाढीव तीस हजाराचा ताण का ओढवून घेतोय अन जीव द्यायची वेळ स्वतःवर का आणतोय?
मित्रांनो, कितीही ताण येऊ द्या. पण काही झालं तरी निराश होऊन जीव देऊ नका. हिंमत सोडू नका! परिस्थिती कायम सारखी राहत नाही. उद्या ती बदलते सुद्धा… हे विसरू नका. आत्महत्या करुन प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे आत्महत्या करु नका. शेवटपर्यंत लढत रहा, आशावादी रहा. यश नक्की मिळेल. “बचेंगे तो और भी लडेंगे” हे ऐतिहासिक वाक्य लक्षात ठेवा. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला उशीरा का होईना, परंतु यश शंभर टक्के मिळतेच!
राज्यात अल्पवयीन मुलांपासून ते वयस्क गृहस्थापर्यंत आणि सामान्य, बेरोजगार व्यक्तीपासून ते उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मुलांमध्ये परीक्षेचा तणाव, प्रेम प्रकरणे, व्यसने, पालक व मुले यांच्यात संवादाचा अभाव, संयम नसणे, आजारपण, भीती, चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत. नैराश्यात किंवा रागाच्या भरात आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला जातो. यामुळे शालेय शिक्षणात मानसिक स्वास्थ्याशी संबंधित विषय असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर समाजात जागृती करणे गरजेचे असल्याचे मत असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
राजेंद्र (बाप्पू) काळभोर,
पुणे जिल्हाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ