संतोष पवार
पुणे : विणीच्या हंगामासाठी यंदा भादलवाडी येथील ब्रिटीशकालीन तलावावर चित्रबलाक पक्षांचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. हे पक्षी तलावातील दाट काटेरी झाडीवर संध्याकाळचा मुक्काम करतात. तर दिवसभर तलावातील उथळ पाण्याचा भाग व उजनीच्या पाणलोट क्षेत्रात या पक्षांची भक्ष मिळविण्याची धडपड सुरु असते. भारतासह लगतच्या पाकीस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ या देशांमध्येही या पक्षाचे वास्तव्य आढळून येत असल्याने, त्याला स्थानिक स्थलांतरीत पक्षी म्हणूनही ओळखले जाते.
गेल्या काही वर्षांपूर्वी त्याची दुर्मिळ पक्षांची नोंद असलेल्या रेड डाटा पुस्तकात दुर्मिळ पक्षी म्हणून नोंद झाल्याचे बोलले जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये उजनीच्या पाणलोटक्षेत्रात या पक्षाचे हजारोंच्या संख्येने दर्शन होते. तर भादलवाडी येथील ब्रिटीशकालीन तलावातील दाट काटेरी झाडीवर घरटी थाटून, हा पक्षी आपला विणीचा हंगाम पूर्ण करत असल्याचेही पक्षी अभ्यासकांना आढळून आले आहे. यामुळे चित्रबलाक पक्षांचे विणीच्या हंगामासाठी पसंतीचे ठिकाण असलेला भादलवाडी तलाव हा देशातील सर्वांत मोठे सारंगगार म्हणून परिचित आहे.
गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तलावातील पक्षांच्या वसाहतीचे ठिकाण बोडके पडले होते. झाडांखाली पाणी नसल्याने याठिकाणी वसाहत थाटण्याकडे पक्षांनी पाठ फिरविली होती. यंदा मात्र या उलट परिस्थिती येथे पहायला मिळत आहे. सध्या शेकडोंच्या संख्येने येथे दाखल झालेल्या चित्रबलाक पक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पक्षी निरिक्षक व्यक्त करत आहेत.
या पक्षांकडून या झाडीवर घरटी बनविण्याचे काम केले जाते. मादी पक्षाकडून त्यामध्ये अंडी दिली जातात. यानंतर ती अंडी उबवून पिल्लांना जन्म दिला जातो. उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह तलावातील विस्तिर्ण जलाशयात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या खाद्याच्या आधाराने या पिलांना मोठे करण्याचे काम हे पक्षी जोडीने करतात. पिल्लांच्या पंखात बळ आल्यानंतर या पक्षांचा येथील मुक्काम आटोपता घेवून ते स्थलांतरीत होतात.
पक्षी निरिक्षक दत्तात्रेय लांघी म्हणाले, टोकाकडे किंचीत बाकदार असलेली मोठी व लांब पिवळ्या रंगाची चोच, मेणासारखा पिवळा चेहरा व त्यावर पिसांचा अभाव, सर्वांगावर पांढरी पिसे व त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असलेले चित्रबलाक पक्षी नर व मादी हे दोन्ही सारखेच दिसतात.
साधारण १९९७ मध्ये या तलावावर चित्रबलाक पक्षांच्या काही जोड्या आढळून आल्या होत्या. यानंतर वर्षानुवर्षे येथे डिसेंबर ते मे महिन्यांदरम्यान त्यांची संख्या वाढलेली दिसते. जेंव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती, तलावात पाणी उपलब्ध नव्हते, अशा वेळी या पक्षांनी येथे वसाहत थाटण्याचे टाळल्याचे दिसून आले आहे. यंदा मात्र तलावातील पाणी साठा बघता येथे हे पक्षी वसाहत थाटण्याची शक्यता आहे.