लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेली तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानी कारभारा विरोधात पालकांच्या तक्रारी अखिल ग्राहक पंचायत हवेली तालुका यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मनमानी कारभार थांबवावा अन्यथा अखिल ग्राहक पंचायतीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी दिला आहे. याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी दादासाहेब लोंढे यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिवरकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पूर्व हवेलीतील अनेक ग्राहक पंचायत हवेली तालुका यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चौकशी केली असता अनेक शाळांनी नियमाबाहय फी वाढ केलेली आहे. तसेच मुलींच्या शौचालयाची अतिशय खराब परिस्थिती, पिण्याचे स्वच्छ पाणी नसणे, शौचालयांच्या दरवाज्यांना कडी नसणे, नळ, बादली नसणे, सॅनिटरी पॅडसाठीची गैरसोय इ. प्रकारच्या अडचणी असून पालक सभेला बोलावून फी संदर्भात विद्यार्थ्यांसमोर अपमानीत करणे अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण देत दुस-या शाळेत पाठविले जाते. त्यामुळे शाळेचा दर्जा खालवत आहे. त्यामुळे अपुरे शिक्षक कर्मचारी तात्काळ भरण्यात यावे. सदर बाबींचा तात्काळ विचार करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे. यावेळी तालुका सचिव कैलास भोरडे, सतिश लंजवाडे उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी दादासाहेब लोंढे म्हणाले, “तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखांना स्वतः शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी वाढवलेली फी, शौचालयांची दुरावस्था, मुला मुलींची होणारी अडचण, पिण्याच्या पाण्याची गैरसोय या सर्वांची चौकशी करून केंद्र प्रमुखांना अहवाल देण्यास सांगितले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कमतरता लक्षात घेता पुणे महानगरपालिकेमध्ये गेलेल्या २३ गावांमधील शाळांचे ३४० शिक्षक हे लवकरच पुन्हा तालुक्यामध्ये रुजू होतील.