पुणे : नाशिक-साईनगर शिर्डी (८२ कि.मी.), पुणे-अहिल्यानगर (१२५ कि.मी.) दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी-पुणतांबा (१७ कि.मी.) दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्राकडून सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डीपीआर तयार करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षीत पुणे ते अहिल्यानगर, साईनगर शिर्डी ते पुणतांबा आणि साईनगर शिर्डी ते नाशिक या थेट रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. तसेच अहिल्यानगर शहर- पुणे-नाशिकदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी २४८ कि.मी. लांबीच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणास मान्यता देण्यात आली आहे.
एकूण २४८ कि. मी. पैकी १७८ कि. मी. चे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ७० कि. मी. चे काम प्रगतिपथावर आहे. याशिवाय तीन नवीन दुहेरी रेल्वे मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मागणीवरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे आणि नगर जिल्ह्यांतील जनतेला ही मोठी भेट दिली आहे.
या मार्गासाठी सल्लागार समितीच्या बैठकीत वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या नवीन रेल्वे मार्गांमुळे पुणे आणि अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासालादेखील गती मिळेल. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीमाल जलद गतीने बाहेर पाठवता येणार आहे. ग्रामीण विकासालाही चालना मिळणार आहे असे मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सुदर्शन डुंगरवाल यांनी नमूद केले आहे.