मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नांवर राज्य शासनाने पाऊले उचलता कायदेशीर लढाईसाठी वरिष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केली असून न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांना पाचारण करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सीमा प्रश्नांच्या संदर्भात सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याबरोबरीने सीमा भागातील बांधवांना शासकीय योजनांचा लाभ, सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची या भागातील नागरिकांना उपलब्धता, तसेच महात्मा फुले फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सीमा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही राज्य शासन गंबीर असून सध्या वरिष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केली असून गरज लागल्यास अधिक विधिज्ञांची नियुक्ती राज्य शासन करणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचा दाखला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.
या प्रश्नासाठी माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.