मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काल गुरुवारी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेटच्या बैठकीत तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली. त्यापूर्वी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.
राजभवन येथे दुपारी १ वाजता झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
दरम्यान, कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून विशेष अधिवेशनात ते नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. कालिदास कोळंबकर हे भाजपचे आमदार आहेत. ते ९ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर आता त्यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.