मुंबई : लाडकी बहीण योजनेसाठी निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मंत्री तटकरे माध्यमांशी बोलत होत्या.
आदिती तटकरे म्हणाल्या, सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. लाभार्थी महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. चारचाकी वाहन असलेल्या महिला अपात्र ठरतील. आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल तर संबंधित महिला अपात्र ठरेल, असे अदिती तटकरे म्हणाल्या.
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले आहेत. १२ लाख ८७ हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते, त्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही.
दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. त्यानंतर डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली.