पुणे प्राईम न्यूज डेस्क: अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर येत्या 17 जानेवारी रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आला आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटातील अनेक कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक पहायला मिळते. या चित्रपटामध्ये अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळते.
अनुपम खेर ‘या’ दिग्गज राजकारण्याची भूमिका साकारताना दिसतात
या चित्रपटात अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत असून त्यांच्या दृश्यानेच ट्रेलरची सुरुवात होते. इंदिरा गांधी यांना पत्र लिहून ते आठवण करून देत आहेत की पंतप्रधानपदाची खुर्ची केवळ एका सिंहासनासारखी नाही, तर डरकाळी फोडणाऱ्या सिंहासारखी आहे, ज्याची गर्जना जगभरात होईल. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात आणीबाणीची घोषणा करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाशी या दृश्याचा संबंध आहे. क्रूरता, हिंसाचार आणि लोकशाहीची हत्या असं सर्वकाही ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.
देशाच्या इतिहासातील सर्वांत प्रतिष्ठित आणि वादग्रस्त नेत्या इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील कंगना यांनी ट्रेलरमध्ये प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. “मीच कॅबिनेट आहे” असं ठरवणाऱ्या इंदिरा गांधी यांचे विविध राजकीय डावपेच, त्याचे परिणाम या सर्व गोष्टी चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारल्यापासून 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात, आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय, मूलभूत अधिकारांचं केलेलं उल्लंघन या सर्वांची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे
या ट्रेलरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे दिसत आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण तर संजय गांधी यांच्या भूमिकेत विशाक नायर हे कलाकार आहेत. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक कंगना रणौत यांनीच केलं आहे. तर रितेश शाह हे या चित्रपटाचे पटकथाकार आहेत. यामध्ये महिमा चौधरी आणि सतिश कौशिक या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.