बीड : सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. विरोधकांनी सरकारला चांगलाच धारेवर धरलं आहे. सरकारमधील काही मंत्रीच या घटनेतील आरोपींना पाठीशी घालत असल्याचे आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा खून झाल्याचा धक्कादायक दावा दमानिया यांच्याकडून करण्यात आला होता.
मात्र, आता त्यांनी केलेला हा दावा त्यांनाच महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याबद्दल बीड पोलिसांनी त्यांना एक नोटीस पाठवली आहे. दमानिया यांनी फरार आरोपींच्या मृत्यूचा दावा केला आहे, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी ही नोटीस बजावली आहे. तसंच ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आले, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेजसह इतर माहिती आणि पुरावे द्या, असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर दमानिया यांनी पोलिसांचे पत्र बघून मला आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया म्हणाल्या की, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे काल मला एक पत्र आले. त्यात सगळी माहिती देण्याचे आवाहन केलं आहे. माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच एसपींकडे पाठवली होती. त्याचे व्हॉइस मेसेजसह सगळे डिटेल्स त्यांना दिले आहेत. पहिले दोन मेसेज जे डिलीट झाले आहेत त्याचीही माहिती पोलिसांना दिली आहे. तरीही मला नोटीस आली आहे त्यामुळे हे पत्र बघून मलाच आश्चर्यच वाटलं आहे.
दमानिया पुढे म्हणाल्या की, तरीही पोलिसांना माहिती हवी असेल तर मी देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर ज्या गावाचा व्हाइस मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तिथे पोलिसांनी ताबडतोब पथक पाठवायला पाहिजे होतं, ते त्यांनी पाठवलं की नाही याचाही खुलासा करायला हवा होता. पण तो केलेला नाही. ही घटना गंभीर असून त्यातील तथ्य पोलिसांकडून बाहेर आले पाहिजे होते. पण तसे होताना दिसत नाही. पण वेळ पडली तर मी तिथे जाणार असंही त्यांनी सांगितले.