दीपक खिलारे
इंदापूर : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य, इंदापूर तालुका महिला संघटकपदी अनिता नानासाहेब खरात यांची निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यसभेचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, डॉ.भारती पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र अनिता खरात यांना देण्यात आले.
यावेळी एमआयटी समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख योगेश पाटील उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना अनिता खरात म्हणाल्या की, देशाच्या शाश्वत व सर्वांगीण ग्रामविकास प्रक्रियेत पंचायत राज व्यवस्थेचे मोठे योगदान आहे. देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे प्रबोधन करणे, विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्ण संयोजन करून त्यांना ग्रामविकास प्रक्रियेत सहकार्य करणे हे एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मी माझा अनुभव, संघटन कौशल्य व सामाजिक योगदान याचा उपयोग करणार आहे.
अनिता खरात ह्या तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या महिला दक्षता समितीवर काम करीत आहेत.
एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य, इंदापूर तालुका महिला संघटकपदी अनिता नानासाहेब खरात यांची निवड झालेबद्दल इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी त्यांचे अभिनंदन केले.