नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यावेळी त्यांनी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना फोन करून धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयने मोक्का न्यायालयात करण्यात आला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे? असं म्हणत एसपी प्रवीण मुंडे यांना धमकावलं होतं, असा आरोप सीबीआयने केला आहे. अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अशी माहिती सीबीआयने कोर्टामध्ये दिली.
भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्या प्रकरणात सीबीआयने सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला असून त्यामध्ये अनिल देशमुख यांनी एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याचा दावा केला आहे.
अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या, असा आदेश दिला होता. परंतु हा गुन्हा जळगावच्या हद्दीत नसल्यामुळे पुण्यात हा गुन्हा नोंदवावा, अशी भूमिका प्रवीण मुंडे यांनी घेतली. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी प्रवीण मुंडे यांचे काहीही ऐकून घेतले नाही, त्यांनी गुन्हा नोंदवून घ्यायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी एसपी प्रवीण मुंडे यांनी याबाबतची कबुली सीबीआयला दिली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
दरम्यान, जळगाव येथील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा यावरून वादविवाद झाला होता. त्यावेळी यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन याप्रकरणी तपास केला. त्यावेळी तत्कालीन अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांनी केल्याचे सीबीआयने सांगितलं आहे.