सोलापूर: जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते आणि ध्येय नक्की गाठता येते. हे सोलापूर येथील रिक्षाचालक सतिश दांडगे यांचा मुलगा अनिकेतने सिद्ध करून दाखविले आहे. अनिकेतने सीए (सनदी लेखापाल) परीक्षेतून यशाला गवसणी घालत आपल्या आई-वडिलांचे त्याने स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. अनिकेत सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने सनदी लेखापालाची परीक्षा नोव्हेंबर २०२३ ला घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.०९) लागला. या परीक्षेत अनिकेतने उत्तीर्ण होऊन यश संपादित केले. या यशासाठी अनिकेतने कोणत्याही शिकवणीला न जात घरीच अभ्यास केला आणि हे यश मिळविले आहे. अनिकेतला या यशासाठी धीरज बलदोटा यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अनिकेतचे वडील सतिश दांडगे हे सोलापुर शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर अनिकेतची आई अंजली गृहिणी आहे. आपल्या मुलाला चांगले शिकवून उच्चपदस्थ बनवण्याचा ध्यास दांडगे यांनी सुरुवातीपासून घेतला होता. अनिकेतची घरची परिस्थिती अत्यंत बेताची. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला शिक्षणाची मोठी आवड होती. अनिकेतचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हरीबाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स येथून त्याने पूर्ण केले.
अनिकेतच्या वडिलांचे स्वप्न होते कि, मुलाला सीए करायचे. त्यासाठी त्यांनी अनिकेतला नेहमी प्रोत्साहन दिले. अनिकेतने वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सीएच्या परीक्षेची तयारी सुरू केली. हा खडतर अभ्यासक्रम करत असताना अनिकेतला त्याचे चुलते भाजप सोशल मिडियाचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्याकडून वारंवार प्रोत्साहन भेटले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे सनदी लेखापालाच्या परीक्षेत अनिकेतने घवघवीत यश मिळविले.
दरम्यान, रिक्षाचालकाचा पुत्र अनिकेत दांडगे याने सनदी लेखापालाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना अनिकेत यांनी यशाचे शिखर गाठून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अभ्यासात सातत्य, मोठे होण्याची जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिकेत होय.
यावेळी बोलताना अनिकेत म्हणाला की, सनदी लेखापालाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर नक्की गाठू शकता.