पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णसेवेपेक्षा पैसे देण्याला प्राधान्य दिल्या जात असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने अटीशर्थीमुळे उपचारासाठी आधी दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी रुग्णालय व्यवस्थापनावर केला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूस दीनानाथ रुग्णालयास जबाबदार असल्याचा आरोप भिसे कुटुबियांनी केला आहे. रुग्णालयाने उपचारापूर्वीच १० लाख रुपयांची मागणी केली होती, जो कुटुंबाला परवडत नव्हता, ज्यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर झाला. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने सुरु केली आहेत. चिल्लर फेकून या घटनेचा निषेध कार्यकर्त्यांनी केला तसेच रुग्णालयाच्या बोर्डला काळे फासले आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तनिषाचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी या घटनेविरुद्ध अंताप व्यक्त केला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाच्या आर्थिक स्थितीचे ऑडिट करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल. हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी नेमलेल्या समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तनिषा भिसे या भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पती होत्या. तनिषाच्या मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने केला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही रुग्णालयाच्या जमीन वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी रुग्णालयाला दरवर्षी ₹१ या नाममात्र भाड्याने जमीन देण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले आहे आणि रुग्णालय या जमिनीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करत आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेमुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेपेक्षा नफ्याला प्राधान्य देण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.