नांदयाल (आंध्रप्रदेश): आपल्या मुलाने एका ट्रान्सजेंडर व्यक्तीशी लग्नाची इच्छा व्यक्त केल्याने मातापित्याने आत्महत्या केल्याची घटना आंध्र प्रदेशच्या नांदयाल जिल्हयात घडली. सुब्बा रायडू (४५) व सरस्वती (३८) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे असल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. या दोघांचा तरुण मुलगा असलेला सुनील कुमार गत तीन वर्षांपासून स्थानिक ट्रान्सजेंडर समुदायाशी जोडला गेला होता. अशातच सुनीलचे एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्याने मातापित्यास धक्काच बसला.
आपण कोणत्याही तरुणीसोबत लग्न करणार नसून ट्रान्सजेंडरसोबतच राहणार असल्याचे सुनीलने ठामपणे सांगितल्याने त्याचे मातापित्यांसोबत अनेकदा वादही झाले. वाद टोकाला गेल्यानंतर अखेर या मातापित्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच सुनीलने ट्रान्सजेंडर साथीदाराचे दीड लाख रुपये खर्च केले होते. त्या पैशांसाठीही ट्रान्सजेंडरकडून मातापित्याला धमकी देण्यात आली होती. या समुदायातील सदस्यांनी सुनीलच्या मातापित्याचा सार्वजनिकरीत्या अपमानही केला होता. त्यामुळेही दोघे निराश होते.