लोणी काळभोर (पुणे): जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी जातीने लक्ष घातल्याने, संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी अशी हायहोल्टेज लढत होणार आहे. महायुतीचे उमेदवार माऊली कटके व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अशोक पवार या दोघांनीही साम, दाम व दंड वापरल्याने, या लढतीत बाजी कोण मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
माऊली कटके आणि आमदार अशोक पवार या दोघांना प्रचार करताना मिळालेल प्रतिसाद पहाता, माऊली कटके यांचा झझांवात अशोक पवार रोखणार? की अशोक पवार आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर माऊली कटके यांना धोबीपछाड देणार हे येत्या 23 तारखेला दुपारी समजणार आहे.
शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीत मागे पडलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत पराभावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदेगट) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या माध्यमातून वेगळी फिल्डिंग लावली आहे. विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या विरोधात व्यूहरचना आखण्यासाठी महायुतीने गेल्या पंधरा दिवसांपासून माऊली कटके यांच्यामागे मोठी ताकद उभा केली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात सत्तेच्या माध्यमातून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात निधी आणण्यासाठी प्रयत्न केले. महायुतीच्या नेत्यांनी माऊली कटके यांना विजयी करण्याचा चंगच बांधला असून, शिरुर व हवेली या दोन्ही तालुक्यातील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी मतदारसंघात गावनिहाय पायपीटही केली. ग्रामीण भागातील मतदारांच्याबरोबरच शहरी मतदाराला बांधून ठेवण्यासह त्याला मतात कनव्हर्ट करण्यासाठी माऊली कटके व त्यांच्या समर्थकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामध्ये ते यशस्वीही झाल्याचे चित्र सध्या आहे.
शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात आमदार अशोक पवार यापुर्वी दोनदा विजयी झाल्याने, त्यांचे मोठे प्राबल्य आहे. मात्र, तरीही महायुतीने माऊली कटके यांच्या माध्यमातून येथे मुसंडी मारली आहे. अशोक पवार आणि माऊली कटके यांच्यात थेट लढत होत आहे. दोघांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत या दोघांनीही साम, दाम व दंड वापरुन मोठी ताकद लावली आहे. भाजपसह शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही माऊली कटके त्यांच्यासाठी ताकद लावल्याचे प्रचारात दिसले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबरच भाजपच्या दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी झोकून काम केले आहे. भाजपने शिरुर व हवेली तालुक्यातील मोठया गावांसह शहरावर फोकस केला आहे. त्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
आमदार अशोक पवार यांनीही महायुतीचे आव्हान स्वीकारून, आपला प्रचार आक्रमकपणे केलेला आहे. या मतदारसंघातून अशोक पवार 2009 व 2019 ला विजयी झालेले असले तरी, 2014 ला त्यांना पराभावाला सामोरे जावे लागले होते. यंदाचीही निवडणूक माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी त्यांच्याच भोवती फिरताना दिसत होती. आमदारकीच्या काळात केलेली कामे, विकासकामे आणण्यासाठी केलेले प्रयत्न, प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर असलेला संपर्क, खुद्द शरद पवार यांची “पॉवर, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची साथ या आमदार पवारांच्या जमेच्या बाजू आहेत. आमदार अशोक पवार यांच्या विजयासाठी महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिक सक्रीय होण्याची गरज आहे. तर दुसरीकडे दोन्ही तालुक्यातील तरुणाई माऊलींच्या पाठीमागे आधिक प्रमाणात असल्याने, पवारांना आपली यंत्रणा शेवटच्या क्षणापर्यंत सक्रीय ठेवण्याची गरज आहे. दोन्ही उमेदवारांची धडपड पहाता, कोण कोणाला धोबीपछाड देणार हे 23 तारखेला दुपारी समजणार आहे.
महायुती व माऊली कटके यांच्या जमेच्या बाजू-
1. दोन्ही तालुक्यातील शहरी भागातील मतदारांवर पकड
2. अजित पवार यांचे लक्ष असल्याने, दोन्ही तालुक्यातील बहुतांश नेते सक्रीय
3. घोडगंगा कारखाना बंद पडल्याने, शिरुर तालुक्यातील ऊस पट्ट्यातील मतदारांची मोठी साथ
4. हवेली तालुक्यातील गावातील मतदारांवर मोठा प्रभाव
5. छोट्या- मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांसोबर दांडगा जनसंपर्क व पाठिंबा
6. जिल्हा परिषद सदस्य असताना गटात विविध विकास कामे केल्याचा अनुभव
7. पहिल्यांदाच आमदारकी लढवत असल्याने स्वच्छ प्रतिमेचा चेहरा
8. पन्नास हजारांहून अधिक भाविकांना देवदर्शन घडवून आणल्याचा मोठा फायदा.
माऊली कटके यांच्या कमजोर बाजू-
1. शिरुर तालुक्यात अशोक पवार यांच्या तुलनेत संपर्क कमी
2. प्रत्यक्ष काम करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या कमी
3. विरोधकांनी चर्चेत आणलेले वाघोली येथील मयुरी प्रकरण
महाविकास आघाडी व अशोक पवार यांच्या जमेच्या बाजू-
1. जेष्ठ नेते शरद पवार यांची समर्थ साथ
2. शरद पवार यांच्या समवेत राहिल्याने कट्टर आमदार असी प्रतिमा
3. दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात वाडी-वस्तीवर असलेला जनसंपर्क तथा पाठबळ
4. विविध मार्गांनी वाडीवस्त्यांवर आणलेला विकासनिधी
5. शहरी व ग्राम भागातील मतदारांमध्ये थेट संपर्क
6. शिरुर व हवेली तालुक्यातील प्रत्येक गावात स्वतंत्र गट
7. आमदारकीच्या काळात हजारो रुग्णांना केलेली मदत
अशोक पवार यांच्या कमजोर बाजू-
1. प्रत्यक्ष काम करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची संख्या कमी
2. पाच वर्षांच्या काळात गावोगावी ठराविक नेत्यांनाच पुढे केल्याने इतर नेते नाराज
3. पदे देताना घराणेशाहीचा आरोप
4. घोडगंगा कारखाना बंद असल्याचा फटका
5. पाच वर्षात एकही मोठे विकास काम दृष्टीक्षेपात नाही