तळेगाव दाभाडे (पुणे) : खुन्नस देत पाहण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाने केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे हि घटना घडली असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आदित्य भेगडे (२७, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर हल्ला करणाऱ्या आरोपीचे अद्याप नाव समजू शकले नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी आदित्य आणि आरोपी मुलगा हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळीत ते एकमेकांच्या समोर आले. खुन्नस देत पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
दरम्यान, आरोपीने आदित्यच्या दिशेने गोळीबार केला. खांद्याला गोळी चाटून गेल्याने आदित्य किरकोळ जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपी मुलगा पसार झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.