पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी रोज नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केले आहे. पाटील हा रुग्णालयात उपचार घेत असतांना त्याला अनेक गोष्टींची मदत करण्यामध्ये या कर्मचाऱ्याचा हात असल्याची माहिती आहे. तसेच तो ललित पाटीलच्या सतत संपर्कात होता. महेंद्र शेवते असे या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो शस्त्रक्रिया विभागात काम करत होता. (Lalit Patil Drug Case)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ससुन रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात महेंद्र शेवते हा शिपाई म्हणून काम करत असताना ड्रग माफिया ललित पाटीलच्या सतत संपर्कात होता. पुणे पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर ही माहिती समोर आली. रुग्णालयात ललित पाटील 16 नंबर वॉर्डमध्ये उपचार घेत असताना, महेंद्र शेवते हा सतत 16 नंबर वॉर्डमध्ये ये जा करत होता. ललित पाटीलला अटक केल्यानंत 16 नंबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 10 ते 12 नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले आहे.
इतर कैद्यांनाही शेवतेची मदत
ललित पाटील प्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजले की, हा कर्मचारी रुग्णालयात दाखल झालेल्या इतर कैद्यांना देखील मदत करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शेवतेच्या चौकशीतून तो कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटील आणि इतर कैद्यांना मदत करत होता हे लवकरच समोर येणार आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणातील ही मोठी घडामोड समजली जात आहे.