लोणी काळभोर, (पुणे) : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शहरात भव्य मिरवणूक काढून गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भाविक भक्तांच्या सोयीसाठी मयूर कदम व संग्राम कदम मित्र परिवाराच्या वतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सोपान नगर परिसरात मूर्ती दान करा व प्रदूषण टाळा, देव द्या.. देवपण घ्या अशा पद्धतीचा सर्व सुविधायुक्त गणपती विसर्जनासाठी व पर्यावरणाचे नुकसान थांबवण्याकरिता कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.
नागरिकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने स्वखर्चाने मयूर कदम, संग्राम कदम, नितीन लोखंडे, हे मागील ५ वर्षापासून यांनी गणपती विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नहि करीत आहेत.
या सर्व सुविधायुक्त गणपती विसर्जनासाठी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर हद्दीतील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील मयूर कदम व संग्राम कदम मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सोपाननगर परिसरात पाण्याचा हौद तयार करून मूर्तीदान कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी मूर्ती दान करणाऱ्या भाविकांना ग्रुपच्या वतीने एक झाड देण्यात येणार आहे.
दरम्यान, मूर्ती पूजा व्यवस्था शुक्रवारी (ता. ०९) सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुविधायुक्त उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.