लातूर : माझ्या मुलाशी संपर्क करून द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोल शिंदेच्या आई-वडिलांनी दिला आहे. सतत पोलिसांचा घेरा आणि चौकशी यामुळे ते त्रस्त झाले असून त्यांना मजुरीसाठी देखील कुठे जाता येत नाही. असं अमोल शिंदे यांच्या आई-वडिलांनी सांगितल. संसदेची सुरक्षा भंग करत घुसखोरी केल्याप्रकरणी लातूरचा अमोल शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
संसदेमध्ये घुसखोरी करून गदारोळ करणारा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तेव्हापासून अमोलचे आई-वडील चिंतेत आहेत.
अमोल शिंदे यांच्या आई वडिलांचा मुलासी गेल्या 4 दिवसांपासून संपर्क न झाल्यामुळे मुलाच्या काळजीने त्यांचा जीव कासावीस होत त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अमोलच्या आठवणीत वडिलांनी अमोलचा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा फोटो असलेला शर्ट देखील घातला आहे. तसेच रोज दारात पोलीस असल्याने कुणी त्यांना मजुरीला देखील बोलवत नाही. त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न देखील त्यांच्यासमोर उभा राहिला आहे, असं अमोल शिंदे याच्या वडिलांनी म्हटलं.