Amol Kolhe : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली याबाबत सर्वत्र चर्चा आहे. कारण, सकाळी अजित पवार गटाकडून 4 खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले होते.
मी शरद पवार यांच्या सोबतच
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाली. मात्र ही भेट फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजितदादांनी महत्त्वाची भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता ही भेट झाली असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले. तसेच मी शरद पवार यांच्या सोबतच आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार गटाला जरी शपथपत्र दिलं असलं तरी त्यांनी शरद पवार गटाला देखील शपथपत्र देत आपण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना, बैठकांना डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती.
खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी
शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करा, अशी मागणी करणारं पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहून केली आहे. आता यालाच पलटवार म्हणून अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केली आहे.