पुणे : पुणे शहरातील रस्त्यांवर, दुभाजकांवर, पदपथावर, साचलेला कचरा तसेच रस्त्यांवर लावलेली बेवारस वाहने, अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर काढण्यासाठी पुणे महापालिकेने आता पुढाकार घेतला असून यासाठी एकाच दिवशी एकाच भागात महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी, अधिकारी यांना रस्त्यावर उतरून स्वच्छता केली जाणार आहे.
शहरातील परिमंडळनिहाय (झोन) ‘सर्वंकष स्वच्छता’ करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून (९ डिसेंबर) त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अतिक्रमण, आकाशचिन्ह, पाणीपुरवठा, मलनि:सारण अशा विविध विभागांतील कर्मचारी एकाच वेळी रस्त्यावर उतरून ही स्वच्छता करणार आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या मोहिमेसंदर्भात माहिती दिली.
शहरातील अनेक भागांतील मोकळ्या जागांवर, रस्त्यांवर, पादचारी मार्ग, तसेच दुभाजक अशा ठिकाणी कचरा साचून असतो. अनेक चौकांमध्ये बेकायदा जाहिरातफलक, बॅनरवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहर बकाल दिसते. शहर स्वच्छ करण्यासाठी एकाच दिवशी पालिकेतील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबवतील, असा निर्णय पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पालिकेतील विभागप्रमुखांची बैठक घेतली.
पुणे महापालिकेचे पाच परिमंडळे असून यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो. परिमंडळनिहाय ही मोहीम राबविली जाणार आहे. पालिकेचे पंधराशेहून अधिक कर्मचारी हे काम करणार आहेत. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातून सोमवारपासून ही मोहीम सुरू होणार आहे. परिमंडळ एकमध्ये ९ ते १४ डिसेंबरदरम्यान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.