पुणे: राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी कोणत्याही सणानिमित्त किंवा हवामानामुळे दिली गेलेली नसून, शिक्षक संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवरून पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात पुकारण्यात आलेल्या या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक संघटना तसेच इतर विविध शिक्षक संघटनांनी ठाम पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येणार आहेत. मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून, सरकारकडून वेळोवेळी आश्वासने दिली गेली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा संघटनांचा आरोप आहे.
विशेषतः, १ ऑगस्ट २०२४ पासून शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन अजूनही शमलेले नाही. सरकारने १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मागण्या मंजूर केल्याचे जाहीर केले होते, मात्र अद्याप त्या संदर्भातील निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त शिक्षक आणि कर्मचारी वर्ग पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर उतरला आहे.
यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ८ व ९ जुलै या दोन दिवशी बंद राहणार असून, शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. पालकांनी या सुट्टीची नोंद घ्यावी, असे आवाहन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







