पुणे : राज्यात उन्हाचा तडाका वाढत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता राज्यातील सर्व शाळा व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ बदलली आहे.राज्यातील सर्व शाळा आता फक्त सकाळच्याच सत्रात भरविण्यात येणार आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश २८ मार्च रोजी सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिला आहे. त्यानुसारयेत्या १ एप्रिलपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.४५ अशी वेळ निश्चित केली आहे.
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनाकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन दिले आहे.तसेच काही जिल्ह्यांनी सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याबाबत आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील वेळापत्रक व शाळेच्या वेळेत एक वाक्यता असणे आवश्यक आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या वेळेत एकवाक्यता असावी, या उद्देशाने हे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी संयुक्तपणे काढलेल्या लेखी आदेशात नमूद केले आहे.
*विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपाययोजना कराव्यात–
विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, वर्गात पंखे सुस्थितीत असावेत
विद्यार्थ्यांनी सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे
उन्हात बाहेर पडणे टाळावे
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे
उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी व शारीरिक हालचाली टाळाव्यात.
शाळांनी वर्गांच्या बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
*राज्यातील शाळांचे असे असेल वेळापत्रक-
प्राथमिक शाळा – सकाळी 7 ते 11:15
माध्यमिक शाळा – सकाळी 7 ते 11.45