नागपूर : महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्यातील सर्व आरोपींची मुख्य न्यायदंडाधिकारी यू.पी. कुळकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली. मोहन पडवंशी, राजेश मेश्राम व इतर आरोपींचा निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये समावेश आहे.
महापालिकेतील स्टेशनरी घीटाळ्याप्रकरणी सदर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय चिलकर यांनी सदर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कंत्राटदार साकोडे आणि त्यांच्या घरच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घोटाळा झाला, त्यावेळी पडवंशी हे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. तसेच राजेश मेश्राम हे लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. ६७ लाख ८ हजार ६३० रुपयांच्या बोगस पावत्या व देयके आरोपींनी मंजूर केले असल्याचा आरोप होता. खोट्या सह्या करून कागदपत्रे तयार करण्यात आली होती. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्ष आरोपींनी स्टेशनरी घोटाळा केल्याचे सिद्ध करू शकला नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले. तपास अधिकारी प्रवीण कांबळे यांनी जप्त केलेले रजिस्टर आरोपपत्रासोबत न्यायालयात दाखल केले नव्हते.
साक्षीदारांनीही कबुली दिली की, त्यांनी ई गव्हर्नस साईट वापरली नव्हती. खरे देयके स्टोअर इन्चार्जला पाठविण्यात आले होते. देयकाला विभागप्रमुख व लेखा विभागाने मान्यता दिली होती. दोन्ही बाजू ऐकून न्यायदंडाधिकारी कुळकर्णी यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे अॅड. संगीता गोघे, बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश नायडू व अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.