पुणे : कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भीमअनुयायांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा याकरीता सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे, याकरीता शासनाच्यावतीने निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, येत्या 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. गतवर्षीच्यावेळी राहिलेल्या त्रुटींची पूर्तता होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याकरीता वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा तयार करावा, स्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्याही विचारात घ्यावी.
पोलीस विभागाने वाहतुकीचे नियोजन करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. पीएमपीएमएलने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. अनुयायांची संख्या लक्षात घेऊन सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांही सुलभरित्या विजयस्तंभास अभिवादन करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णवाहिका, प्रथमोपचार पेटी पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. एकंदरीत अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, अशाही सूचना अजित पवार यांनी दिल्या.
बैठकीस पुणे शहरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए अग्नीशमन विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित होते.