मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज (५) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सलग सहाव्यांदा शपथ घेतली. गावरान भाषा, रोखठोक स्वभाव आणि प्रशासनावर मजबूत पकड असणारा नेता अशी अजित पवार यांची महाराष्ट्रभर ओळख असून, त्यांनी आपल्या कामाने राज्यातील राजकारणावर वेगळी छाप पाडली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये अजित पवार यांनी वेगवेगळ्या सरकारांमध्ये तीनवेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राज्यात सरकार कोणाचेही असो, तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोणीही असो, उपमुख्यमंत्री मात्र अजित पवारच राहिले आहेत. यामुळे त्यांना समाजमाध्यमांवर ‘पर्मनंट उपमुख्यमंत्री’ असे संबोधले जाते.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असून, त्यांचे चुलते शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांनी कृषी, सहकार क्षेत्रात विविध संस्थांचे जाळे निर्माण केले आहे. पवार हे १९९१ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले. त्यानंतर बारामतीमधून सलग आठवेळा त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा, ऊर्जा, अर्थ-नियोजनसारख्या खात्यांसह उपमुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे.
पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून कारकीर्द
पहिल्यांदा: १० नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१२ (काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकार)
दुसऱ्यांदा: २५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४ (काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार)
तिसऱ्यांदा: २३ नोव्हेंबर २०१९ ३ २६ नोव्हेंबर २०१९ (महायुती सरकार)
चौथ्यांदा: ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ (महाविकास आघाडी सरकार)
पाचव्यांदा: २ जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२४ (महायुती सरकार)
सहाव्यांदा: ५ डिसेंबरपासून पुढे (महायुती सरकार)
दरम्यान अजित पवार यांनी महायुती सरकारच्या काव्यात राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. जुलै २०२३ मध्ये पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर यंदाची विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ४१ आमदार निवडून आणत आपले नेतृत्व सिद्ध केले, त्यामुळे, सलग सहावेळा उपमुख्यमंत्रिपद भूषविणारे पवार हे देशातील एकमेव नेते ठरणार आहेत.