बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या राखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा थेट व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना खडसावतात. असाच प्रकार बारामतीत एका कार्यक्रमात घडला. अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एकामागोमाग एक विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. भाषणादरम्यान सतत येणारी निवेदने पाहून ते वैतागले आणि मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला, असे म्हणत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली. मात्र, या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोलपंप इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. अजित पवार यांची वादग्रस्त विधाने अलिकडे कमी झाली होती. परंतु, आज पुन्हा कार्यकत्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या दौऱ्यात त्यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकांऱ्यांकडून माहितीही घेतली. यासोबतच त्यांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवले, त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरीदेखील त्यांनी त्यांना मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय असे म्हणत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे संकेत दिले.
लोकसभेच्या पराभवाचे शल्य अजूनही मनात !
अजित पवारांनी एकाच भाषणात तीन वेळा ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, असा शब्द वापरला. खराडवाडी गावातील नागरिकांनी लोकसभेला आपल्याला फसवले याचा पुनरुच्चार अजित पवारांनी खराडवाडीतील काहीजण समोर दिसताच त्यांची नावे घेऊन केला. त्यानंतर स्वतःला आवरत जाऊ द्या, मला माणूस दिसला की आठवते, असे म्हणत ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय असे ते म्हणाले. त्यामुळे अजित पवारांना लोकसभेच्या पराभवाचे शल्य अजूनही आहे, अशी चर्चा रंगली.