पुणे : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election) बिगुल आता वाजलं आहे. त्यात आता बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी दोघे जोडीने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं त्यानंतर दोघांनी मिळून आरती केली. या निवडणुकीमध्ये आपला मोठा विजय होऊदेत यासाठी दगडूशेठ गणपतीला साकडं घातलं, अशी प्रतिक्रीया सुनेत्रा पवार यांनी दिलीय.
यावेळी पुढे अजित पवार म्हणाले, या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election)चांगल्या वातावरणात पार पडायला हव्यात यासाठी गणरायाचे आशीर्वाद घेतले. गणरायाने मला भरभरुन दिले आहे, आता सर्वांचे भले कर. लोकसभेला महाराष्ट्रामधून महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावेत, अशी प्रार्थना गणरायाकडे केली. गणरायाचा आशिर्वाद घेतला असला तरीसुद्धा प्रत्येकांनाच काम करावे लागते आणि फिरावे लागते. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. प्रत्येक पक्ष जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करतील.
पुण्यामधील अर्जाविषयी तसेच शक्तीप्रदर्शनाविषयी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जायचे असे आम्ही ठरवलेले आहे. येथील पुण्यातील अर्ज भरल्यानंतर आम्ही सांगली आणि सातारास जाणार आहोत. सगळीकडील फॉर्म भरले जातील त्यानंतर सभा होणार आहेत.
ईव्हीएमच्या वक्तव्यावर बोलताना पुढे अजित पवार म्हणाले, ध चा म करु नका. ती जाहीर सभा नव्हती. जाहीरनाम्यात पण काय करणार सांगितले जाते याचा अर्थ प्रलोभन दाखवले असे म्हणता येणारही नाही. मी नेहमी आचारसंहितेमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची खबरदारी घेतो. काही कारण नसतानाही कशाचाही बाऊ करु नका. राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर मी वक्तव्य केले. फक्त मी थोडं ग्रामीण भाषेमध्ये वक्तव्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कार्यकर्ते यांच्यात पुण्यातील विमान नगर परिसरातील हॉटेलमध्ये बैठक झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे हिमतीने आणि ताकदीने काम करण्याचे आव्हान केले आहे. या विषयी बोलताना पुढे अजित पवार म्हणाले, रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्यामुळे काही विषयांवर चर्चा केल्या आहेत.