मुंबई : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत असून दिल्लीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्त त्यांचे पुतणे अजित पवार हे शरद पवारांची भेट घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज शरद पवार आणि अजित पवार दोघेही दिल्लीत असून सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे शुभेच्छा देण्यासाठी 6 जनपथवर पोहोचले आहेत.
शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जाणार का? याची कालपासून चर्चा होती. मात्र, हे सर्व नेते दिल्लीत असल्यामुळे अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार अजित पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचे स्वागत केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांना आस्मान दाखवलं, तर विधानसभा निवडणुकीत 41 आमदार निवडून आणून अजितदादांनीही स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे.