बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी चांगलीच जोर धरत आहे. दुसरीकडे, बीडमधील संपूर्ण गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेतून बीडचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे या दोघांना न देण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. बीड जिल्ह्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी पालकमंत्रिपद अजित पवार स्वतःकडे घेऊ शकतात. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने कोणत्या पक्षाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यायचे, याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.