लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढे पुढे करणारे आणि काम करून घेणारे अजित पवार गटाचे स्वयंघोषित नेते व कार्यकर्त्यांमधील ९० टक्क्यांहून अधिक पुढारी, कार्यकर्ते लोणी काळभोर परिसरातील अनेक मतदान केंद्रावर फिरकले नसल्याचे चित्र आज सोमवारी (ता.१३) प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे याचा मतदान प्रक्रियेवर काय परिमाण होणार? हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया आज सोमवारी (ता.१३) पार पडत आहे. सर्व राजकीय पक्षांनी साम-दाम-दंड ही तिन्ही आयुधे वापरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असले तरी शरद पवारांची तुतारी व अजित पवारांचे घड्याळ यांच्यामध्ये बारामतीनंतर शिरूरमध्ये खरी लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पवारांसाठी अस्तित्वाची व प्रतिष्ठेची मानली जात आहे.
तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया ७ मे ला पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर, त्याच दिवसाच्या संध्याकाळपासून अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत सभांचा धडाका सुरु केला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. अनेक सभांमधून आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांचे वाभाडे काढले. त्यांनी अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांचा विशेष शैलीतून खरपूस समाचार घेतला.
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह ३२ उमेदवार आपले नशीब आजमविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप झाल्याने ही निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे उभ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.