पंढरपूर (सोलापूर) : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जाळण्यात आली असल्याची घटना घडली आहे. आषाढी वारीनिमित्त बारसकर पंढरपुरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय महाराज बारस्कर यांनी पंढरपुरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासा साठी उभारलेल्या 65 एकर येथील भक्तिसागर येथे पार्क केली होती. बारस्कर यांनी स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली . बारसकर यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 1 लाखाचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितले आहे . पोलीस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.
अजय महाराज बारस्कर यांनी दोन दिवासपूर्वी पंढरपुरात येण्या आधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. पंढरपूर मध्ये ये तुला मारतो जाळतो अशा धमक्या येत असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी बारस्कर यांनी सोशल मिडीयावर शेअर केला होता. बारस्कर यांनी सोशल मीडियावर पोस्टवर करत पंढरपूरला येणार असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने ते अचानक चर्चेत आले होते. बारस्कर त्यांनी जरांगेंच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अजय बारस्कर आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी झडली होती. मनोज जरांगेंच्या बाजूने असलेले अनेक कार्यकर्ते बारसकर यांच्यावर नाराज होते.