पुणे : पुण्यातून बँकॉकसाठी येत्या २० डिसेंबरपासून आणखी विमान सेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बँकॉकसाठी आता दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांचे पर्याय असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे-बँकॉक विमान सेवा सुरू झाली होती. आता दुसऱ्या कंपनीकडून ही बँकॉकसाठी विमान सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना पर्याय मिळाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीकडून पुणे बँकॉक विमानसेवा पुण्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार आहे. ती पुण्यातून सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ते विमान बँकॉक येथे दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी सुटेल.
बँकॉक-पुणे विमान सेवा हीदेखील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी तीन दिवस असेल. बँकॉक येथून पुण्यासाठी दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी विमान सुटेल. ते पुण्यात सहा वाजून २५ मिनिटांनी दाखल होईल. काही दिवसांपूर्वीच इंडिगोकडून पुणे-बँकॉक आणि पुणे-दुबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून आता पाच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यापैकी बँकॉकसाठी दोन, दुबईसाठी दोन आणि सिंगापूरला एक अशी विमान सेवा आहे.