नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकारण चांगलेच तापले होते. आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून यूटर्न घेतला असून नाशिक येथे शेतकरी संघटनांशी चर्चा करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन त्यांना दिल आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिले होते. मात्र सत्ता येताच त्यांनी आपली भूमिका तात्काळ बदलली. या उलट ३१ मार्च अखेर सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरावे, असे आवाहन पवार यांनी केले होते. तसेच कृषी मंत्री कोकाटे यांनी देखील कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर हा विषय आपला नाही असं त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शेतकरी संघटना तसेच विविध शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना टार्गेट केले होते. त्यानंतर आता कृषिमंत्री यांनी आपली भूमिका बदलली आहे.
राज्यभर गाजत असलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल आहे.