मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी महाराष्ट्रात ‘कृषी दिन’ (Maharashtra Krishi Din 2025) उत्साहात साजरा केला जातो, महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी आणि बळीराजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. 1963 ते 1975 या कालावधीत वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि कृषी विद्यापीठांची स्थापना करून राज्याला शेतीत अग्रेसर बनवले.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या लोकनेत्याच्या कार्याचे स्मरण म्हणून हा खास दिवस दरवषी साजरा केला जातो. दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, शेतीत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरचे उपाय यावर चर्चा केली जाते. तसेच, शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्या कार्याचा गौरव करून, त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

वसंतराव नाईक यांचे शेतीसाठी योगदान
वसंतराव नाईक यांनी अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. पाणी व्यवस्थापन, दुष्काळ निवारण आणि अन्नधान्याच्या बाबतीत राज्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. त्यांच्या काळात महाराष्ट्रात हरित क्रांतीला मोठा वेग मिळाला. 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, कृषी विद्यापीठांची स्थापना, आधुनिक बी-बियाणे आणि खतांचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे, अशा अनेक निर्णयांनी त्यांनी शेती क्षेत्राचा कायापालट केला. दुष्काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे हे योगदान आजही राज्याच्या कृषी धोरणांसाठी मार्गदर्शक ठरते.
वसंतराव नाईक यांनी दाखवलेला दूरदृष्टीचा मार्ग आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची वृत्ती आजही अत्यंत प्रेरक आहे. त्यांच्या कृषी धोरणांचा अभ्यास करून, आजच्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेरणा घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. कृषी दिनानिमित्त राज्याच्या कृषी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी कटिबद्ध होऊन शेतकरी हितासाठी कार्य करणे, हेच १ जुलै रोजीच्या या विशेष दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे.







