Yavat News यवत, ता. ७ : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा परिसरात सामाईक विहिरीच्या वापरावरून जुना वाद पुन्हा चिघळत थेट रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीत पोहण्यास विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी एका शेतकरी दाम्पत्यावर लोखंडी गज, कुऱ्हाड आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी पती-पत्नीवर पार्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून याप्रकरणी Yavat Police Station येथे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Yavat News
याबाबत अमोल सुभाष बारवकर (वय ३५, रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आणि भावाच्या शेतीचे क्षेत्र वाटप झाले असले तरी विहीर सामाईक आहे. या विहिरीचे पाणी शेती व पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, भावकीतील दत्तात्रय संपत बारवकर हा वारंवार विहिरीत पोहत असल्याने अमोल बारवकर यांनी त्याला विरोध केला होता. याच कारणावरून दोघांमध्ये जुना वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, ४ मे रोजी दुपारी अमोल बारवकर यांनी दत्तात्रय बारवकर याला विहिरीत पोहू नको असे सांगितले असता त्यांच्यात जोरदार वाद झाला. “ही तुझी एकट्याची विहीर नाही,” असे म्हणत दत्तात्रय बारवकर याने धमकी देत तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अमोल बारवकर हे घरी जनावरांना चारा-पाणी करत असताना दत्तात्रय बारवकर हा लोखंडी गज घेऊन, तर अभिजीत अशोक बारवकर हा कुऱ्हाड घेऊन त्यांच्या घरासमोर आला. दोघांनी अमोल बारवकर आणि त्यांच्या पत्नी मोनिका यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दत्तात्रय बारवकर याने मोनिका बारवकर यांच्या डोक्यात लोखंडी गज मारल्याने त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या.
पत्नीला वाचवण्यासाठी धावलेल्या अमोल बारवकर यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यात मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. या वेळी अमोल यांचा भाऊ अजिनाथ बारवकर याने “आज यांना जिवंत सोडू नका” अशी चिथावणी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनास्थळी नातेवाईक धावत आल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दत्तात्रय संपत बारवकर, अभिजीत अशोक बारवकर आणि अजिनाथ सुभाष बारवकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११०, ११५(२), ११८(१), १२५(अ), ३(५), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







