पुणे: लोकसंघर्ष पक्षातर्फे गेले अनेक महिने सातत्याने राज्य सरकारकडे ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली गेली आहे. मात्र, यावर राज्य सरकारने कोणतीही कृती केलेली नाही. राज्य शासनाला जागे करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात आले. ऑनलाइन गेमिंगमुळे आबालवृद्धांना वेड लावले आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने नियमावली केलेली नाही. त्यामुळे लोकसंघर्ष पक्षाकडून हे अनोखे आंदोलन मंगळवारी करण्यात आले.
ऑनलाइन गेमिंगमुळे लोकांना त्याचे व्यसन लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष ॲड. योगेश माकणे, संघटक ॲड. शिवम पोतदार, ॲड. अभिजित कुलकर्णी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रम्मी, तीन पत्ती हे खेळ पैसे लावून खेळले. जर ऑनलाइन गेमिंगचा जुगार चालू शकतो, तर मग पारंपरिक पद्धतीने पैसे लावून खेळाला जाणारा जुगार कायद्याला का चालत नाही?, असा प्रश्न पक्षाच्या वतीने विचारण्यात आला. राज्य सरकारने पुढील दोन महिन्यांमध्ये ऑनलाइन गेमिंगबाबत कठोर कायदे केले नाही, तर पक्षाच्या वतीने मंत्रालयासमोर ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे ॲड. माकणे यांनी सांगितले.