पुणे : दिवाळी उत्साहात साजरी झाली, आता तुळशी विवाहाचे वेध लागले आहेत, त्यानंतर लगीनसराई सुरु होणार आहे. यासाठी दिवाळी नंतरही बाजार फुलला आहे. आता लग्नसराईत पुन्हा बाजार तेजीत आहेत.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत लग्नसराईत बाजारपेठेत मंदी होती. आता दिवाळी व यापूर्वी असलेल्या गणपती, नवरात्रोत्सव, दसऱ्यात ही मंदी काहीशी धुवून निघाली.
यंदा २६ नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात होत असून मार्च अखेरपर्यंत तब्बल ३१ मुहूर्त आहेत. नंतरच्या चैत्र महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये गुरूचा अस्त असल्याने एकही विवाह मुहूर्त नाही. मात्र मे व जून महिन्यातही २६ मुहूर्त आहेत. एकंदरीत यंदा नोव्हेंबर ते जून दरम्यान तब्बल ५७ विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर लग्नसराईत बाजाराला पुन्हा झळाळी येईल.
५ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला सुरवात व ८ तारखेला समाप्ती होईल. यानंतर यंदाच्या लग्नसराईतील पहिलीच तिथी २६ नोव्हेंबर आहे. तेव्हापासून जूनपर्यंत तब्बल ५७ विवाह मुहूर्त आहेत. यापैकी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ३१ आणि मे ते जून दरम्यान २६ मुहूर्त आहेत. त्यातही गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी, मे व जून या तीन महिन्यांत सर्वाधिक मुहूर्त आहेत.
“यंदा चैत्र महिन्यात (एप्रिल) गुरूचा अस्त असल्याने मुहूर्त नाहीत. गेल्या दोन वर्षांत कोरेानाच्या काळातही लग्न सोहळे पार पडले. मात्र, वेगवेगळे निर्बंध असल्याने मोठे विवाह खोळंबले होते. अशा कार्यांना यंदा मुहूर्त गवसेल. आपत्कालीन मुहूर्त साधता येतील. मुहूर्तावर विवाह धुमधडाक्यात संपन्न होतील,” असे गुरुजींचे मत आहे.
लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे ऑटोमोबाईल आदी मोठ्या क्षेत्रासह घोडा, बग्गी, पुरोहित, हार-फुले सजावट, मंडप आदी सर्वच क्षेत्रांना झळाळी येईल. आतापासून मंगल कार्यालय, हॉल व अन्य बुकिंग सुरु होईल. यासोबतच बाजारात खरेदीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सराफा बाजार, कपडे, किराणा या माध्यमातून मोठीच उलाढाल होते. लहानमोठ्या व्यावसायिकांना देखील रोजगार मिळतो.